बचती आणि गुंतवणूक यावर भर देण्यासाठी नवीन कर प्रणाली बंद करावी – डॉ. रवींद्र जाधव

बचती आणि गुंतवणूक यावर भर देण्यासाठी नवीन कर प्रणाली बंद करावी – डॉ. रवींद्र जाधव

बचती आणि गुंतवणूक यावर भर देण्यासाठी नवीन कर प्रणाली बंद करावी – डॉ. रवींद्र जाधव
कोपरगांव । प्रतिनिधी ।
सरकारने कर रचनेमध्ये बदल करताना आर्थिक वर्ष 2020-21 पासून नवीन कर प्रणाली लागू केली. यानुसार करदात्यास जुन्या तसेच नवीन कर प्रणालीनुसार कर भरता येतो व करदाता तो त्याच्या सोयीनुसार जुनी किंवा नवीन करप्रणालीची निवड करतो. एकंदरीतच बघितल्यानंतर असे लक्षात येते की जास्त संख्येने करदाते नवीन कर प्रणालीनुसार कर भरतात. त्याचे कारण नवीन कर प्रणालीनुसार कराचे दर हे जुन्या कर प्रणालीपेक्षा कमी आहेत व त्यानुसार येणारी कराची रक्कम ही कमी येते. परंतु नवीन कर रचनेमध्ये जुन्या कर रचनेप्रमाणे जे विविध सवलती व वजावटी दिल्या जातात त्या दिल्या जात नाहीत. प्रामुख्याने कलम ८० सी ते ८० यु अंतर्गत बचत व गुंतवणुकीसाठी वजावटी दिल्या जातात. त्या नवीन प्रणालीत नसल्यामुळे व जुन्या करप्रणालीनुसार लोक कर भरत नसल्यामुळे या बचती व गुंतवणुकीकडे लोकांचा कल कमी झाला आहे. जसे की कर वाचविण्यासाठी करदाते गृह कर्ज, आरोग्यासाठी आरोग्य विमा, बँकेमध्ये मुदत ठेव, विविध सरकारी व सामाजिक संस्थांना डोनेशन, बचत ठेवी व इतर अनेक बचती व गुंतवणुका कलम ८० सी ते ८० यू अंतर्गत करत असत. त्यामुळे देशातील लोकांच्या बचती व गुंतवणुकीच्या सवयी वाढीस लागून करदात्यांचे आर्थिक नियोजन होवून भविष्य सुरक्षित होत असते व अर्थव्यवस्थेला देखील भांडवलाचा पुरवठा यातून होत असतो. परंतु जुनी कर प्रणाली प्रमाणे नवीन कर प्रणालीमध्ये या वजावटी न ठेवल्यामुळे लोकांच्या बचती व गुंतवणुकीच्या सवयी कमी झालेल्या आहेत. लोक चंगळवादी संस्कृतीकडे ओढले जात आहेत व अर्थव्यवस्थेला होणारा वित्तीय पुरवठा कमी होण्याचा धोका दिसून येतो. तरी माझी या बजेटमध्ये अशी अपेक्षा आहे की जुनी व नवीन कर प्रणाली न ठेवता एकच कर प्रणाली ठेवून त्यामध्ये या वजावटी देण्यात याव्यात व करदात्याचे करदायित्व नवीन कर प्रणाली प्रमाणे कमीत कमी राहील व जास्तीत जास्त करदाते कर भरतील याकडे या बजेटमध्ये लक्ष देण्यात यावे ही अपेक्षा.
—————————–
डॉ. रवींद्र जाधव
सहयोगी प्राध्यापक
वाणिज्य व व्यवस्थापन शाखा,
के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव.



