ब्रेकिंग

थोरात कारखान्याकडून दीपावलीनिमित्त 25.10 कोटी बँकेत वर्ग

थोरात कारखान्याकडून दीपावलीनिमित्त 25.10 कोटी बँकेत वर्ग

200 रुपये प्रति टनाप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर
संगमनेर ।  प्रतिनिधी । काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावलीनिमित्त ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रति टन प्रमाणे बँकेत वर्ग करण्यात आली असून ऊस विकास अनुदान, ठेव व ठेवीवरील व्याज आणि कामगार बोनस असे एकूण 25.10 कोटी रुपये बँकेत वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

कारखान्याकडून विविध रक्कम बँकेत वर्ग केल्यानंतर अधिक बोलताना व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने कायम उच्च अंकी भाव दिला आहे. 2024 – 2025 हंगामात गळीत झालेल्या ऊसाला प्रति टन 200 प्रमाणे बँकेत वर्ग करण्यात आले आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 3200 रुपये प्रति टन भाव मिळाला आहे. याचबरोबर कारखान्याच्या कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे.कारखान्याने कायम सभासद,शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण केला असून कारखान्याच्या मोठ्या आर्थिक उलाढाली मधून संगमनेर मधील बाजारपेठ समृद्ध झाली आहे. यावर्षी दीपावलीनिमित्त ऊस विकास अनुदानाचे 12.50 कोटी रुपये ठेव व ठेवीवरील व्याज 3.60 कोटी रुपये व कामगार बोनस 9 कोटी रुपये असे एकूण 25.10 कोटी रुपये बँकेत वर्ग करण्यात आले आहे.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व अमृत उद्योग समूहातील इतर सहकारी संस्था यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत सुमारे 150 कोटी रुपये येत असून यामुळे बाजारपेठ फुलली आहे. कारखान्याने दीपावली निमित्त दिलेल्या या रकमेमुळे सभासद व कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक, कारखान्याचे कामगार त्यांचे कुटुंबीय शेतकरी व शहरातील व्यापारी बंधू यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याचबरोबर कारखान्याच्या सर्व सभासदांना कारखान्याच्या वतीने 30 किलो मोफत साखर वाटप 15 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून सर्व सभासदांनी कारखाना कार्यस्थळावर येऊन आपली साखर घेऊन जावे असे आवाहन व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे. कारखान्याच्या या निर्णयाचे शेतकरी सभासद व कामगार वर्गातून अभिनंदन होत आहे.

संगमनेरच्या बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढणार

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूहातील सर्व संलग्न संस्थांच्या वतीने दिवाळी निमित्ताने बोनस व इतर देण्यासह सुमारे 150 कोटी बाजारात येणार असल्याने आर्थिक उलाढाल वाढणार आहे. मागील एक वर्षापासून अस्थिर वातावरणामुळे ठप्प झालेल्या बाजारपेठेला दिलासा मिळणार असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!