ब्रेकिंग

सरकारने साखर कारखान्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात – मा.कृषीमंत्री बाळासाहेब थोरात

थोरात कारखान्याचा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

सरकारने साखर कारखान्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात – मा.कृषीमंत्री बाळासाहेब थोरात

थोरात कारखान्याचा गळीत हंगाम सांगता समारंभ संपन्न

संगमनेर । प्रतिनिधी । साखर कारखानदारी मधून राज्य व केंद्र सरकारला दरवर्षी काही हजार कोटींचा टॅक्स दिला जातो. अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या सहकारी साखर कारखानदारीला सरासरी दहा वर्षातून एकदा अडचण येते अशा वेळेस सरकारने कारखानदारीच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांसाठी कर्जाचे पुनर्गठन करणे, कमी व्याज दराने कर्ज देणे, आधारभूत किंमत वाढवणे, इथेनॉलचा भाव वाढवणे यांसह विविध प्रोत्साहनपर योजना राबवाव्या अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 – 26 या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मा.आ.डॉ.सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर ॲड.माधवराव कानवडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पा घुले, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, सभापती शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी, बाबासाहेब ओहोळ, संपतराव डोंगरे,इंद्रजीत भाऊ थोरात, हौशीराम सोनवणे, कारखान्याचे संचालक संतोष हासे, संपतराव गोडगे, नवनाथ आरगडे,विनोद हासे, सतीश वर्पे,रामदास धुळगंड, रामनाथ कुटे, विजय राहणे,अरुण वाकचौरे, योगेश भालेराव,विलास शिंदे,अंकुश ताजणे, दिलीप नागरे,मदन आंबरे, बंडू भाबड,सौ.लताताई गायकर, रामदास पा.वाघ, राजेंद्र गुंजाळ, मीनानाथ वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कृष्णा दिघे, रामदास तांबडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, दर दहा वर्षातून साखर कारखानदारी व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होत असतात अशा काळामध्ये सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कारण काही हजार कोटी टॅक्स हा साखर कारखानदारीच्या माध्यमातून सरकारला मिळतो. अर्थव्यवस्था बळकट करण्यामध्ये या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. म्हणून अडचणीच्या काळामध्ये कर्जाचे पुनर्गठण करणे, एमएसपी साधारण चार हजार रुपये करणे, बिगरव्याची कर्ज देणे, पेट्रोलला पर्याय असणाऱ्या इथेनॉलला भाव देणे,कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देणे यासह विविध प्रोत्साहन पर योजना राबवल्या पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

त्याचबरोबर राज्यात यावर्षी जास्त पाऊस झाला. उसाचे टनेज घटले, कारखान्यांची संख्या वाढली.गाळप क्षमता वाढली. ऊस मिळवण्यासाठी स्पर्धा झाल्या. अशा काळातही थोरात कारखान्याने आपली उज्वल परंपरा जपत अवघ्या 110 दिवसांमध्ये 11.40 रिकव्हरी दिली असून 7 लाख 65 हजार मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. कालव्यांमधून पाणी येत असल्याचा आनंद आहे. परंतु हे पाणी वंचित सर्वांना मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे. याचबरोबर तालुक्यात, कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढवण्याबरोबर एकरी उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा अत्यंत कार्पोरेट पद्धतीने काम करतो आहे. सहकारी क्षेत्रात अनेक अडचणी आहेत. या क्षेत्रामुळे ग्रामीण भागात समृद्धी आली असल्याने सहकार जपला पाहिजे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार प्रदर्शन व्हा.चेअरमन पांडुरंग पा घुले यांनी केले. यावेळी अमृत उद्योग समूहातील व संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद कार्यकर्ते नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांना 10 टक्के वेतन वाढ

थोरात कारखान्याने कायम सभासद,शेतकरी, ऊस उत्पादक यांच्याबरोबर कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. राज्य पातळीवर ठरल्याप्रमाणे वेळोवेळी नियमांची अंमलबजावणी केली असून सर्व कर्मचाऱ्यांना 10 टक्के वेतन वाढ देण्यात आली असून अनेक कामगारांची मुले उच्चशिक्षित झाले असून आज देशात व परदेशात काम करत आहे. या सर्वांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्याचे काम कारखान्याच्या माध्यमातून झाले असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव

अमृत सांस्कृतिक मंडळ व थोरात कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने कारखान्याच्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, बॅडमिंटन या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!