कोपरगावात अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; 25.60 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरगावात अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; 25.60 लाखांचा मुद्देमाल जप्त


कोपरगावात अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; 25.60 लाखांचा मुद्देमाल जप्त
कोपरगाव । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई सुरू केली असून, कोपरगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवासह तब्बल 25 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक व उपशाविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टाटा कंपनीच्या हायवामधून वैजापूरकडून पुणतांबा फाट्याकडे अवैध वाळूची वाहतूक केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पंचांसमक्ष पुणतांबा फाटा, ता. कोपरगाव येथे सापळा रचला. संशयित हायवा येताच पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली.वाहन चालक भाऊसाहेब देविदास मोरे (वय 40, रा. खटकळी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.
या कारवाईत पोलिसांनी 25 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा पांढरा-निळ्या रंगाचा हायवा (क्र. एमएच-43-वाय-0520) तसेच 60 हजार रुपये किमतीची 6 ब्रास वाळू, असा एकूण 25 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 480/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, सतीश भवर व बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने केली.



