दुचाकी चोरीचा छडा लावणाऱ्या शिर्डी पोलिसांची पाठ थोपटली; उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
कौतुकाची थाप, कामाला नवी ऊर्जा!

दुचाकी चोरीचा छडा लावणाऱ्या शिर्डी पोलिसांची पाठ थोपटली; उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

उत्कृष्ट कामगिरीची शाबासकीची थाप; अमोल भारती म्हणाले, ‘अशाच पद्धतीने कामाला गती द्या’
शिर्डी । विनोद जवरे । शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत संशयित आरोपीला अटक करून तब्बल ११ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्याची उत्कृष्ट कामगिरी शिर्डी पोलिसांनी केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना शिर्डी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ११ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. या तपासातून शिर्डी, श्रीरामपूर, चाळीसगाव व नेवासा आदी पोलीस ठाण्यांतील सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती साहेब यांनी शिर्डी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील काळातही अशाच प्रकारे तत्परतेने, मेहनतीने आणि प्रभावीपणे काम करून गुन्हेगारीला आळा घालण्याचे आवाहन केले.

“चांगल्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो आणि कामाला आणखी गती मिळते,” या भावनेतून अमोल भारती यांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.या सत्कारामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
कौतुकाची थाप, कामाला नवी ऊर्जा!
गुन्हा उघडकीस आणणाऱ्या शिर्डी पोलिसांचा अमोल भारती यांच्या हस्ते सत्कार; उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिल्या शुभेच्छा.


