शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी; मोटारसायकल चोरट्याला अटक, ११ दुचाकी जप्त
शिर्डी, पाथर्डी, बिडकीन, चाळीसगावसह विविध ठिकाणांहून चोरलेल्या दुचाकींचा छडा; सहा गुन्हे उघड

शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी; मोटारसायकल चोरट्याला अटक, ११ दुचाकी जप्त


शिर्डी, पाथर्डी, बिडकीन, चाळीसगावसह विविध ठिकाणांहून चोरलेल्या दुचाकींचा छडा; सहा गुन्हे उघड
शिर्डी । प्रतिनिधी । शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला शिर्डी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तब्बल ११ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होणार असून, पोलिसांच्या तपासातून चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

शिर्डी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान विशाल रतन चव्हाण (वय २४, रा. कालिकानगर, शिर्डी, मूळ रा. एमआयडीसी, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपीने चोरी केलेल्या मोटारसायकली शिर्डी, पैठण, बिडकीन, चाळीसगाव, नागरेदेवळा, सोगाव आदी ठिकाणी ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी जाऊन तब्बल ११ मोटारसायकली जप्त केल्या.
११ दुचाकी जप्त; सहा गुन्ह्यांचा छडा
शिर्डी पोलिसांनी मोटारसायकल चोरीप्रकरणी आरोपीला अटक करून ११ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. तपासातून शिर्डी, श्रीरामपूर, चाळीसगाव व नेवासा पोलीस ठाण्यांतील एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कारवाईत होंडा शाईन, हिरो स्प्लेंडर प्लस, टीव्हीएस स्टार सिटी प्लस, बजाज पल्सर यासह विविध कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश आहे. काही मोटारसायकलींचे नंबर उपलब्ध नसून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यातील दोन, श्रीरामपूर शहर, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण आणि नेवासा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, अशा एकूण सहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, प्रदीप बोराडे, महादेव गुटे, पोलीस हवालदार संतोष लांडे, पदवीधर पोलीस अंमलदार राघव कोतकर, केवळसिंग राजपूत, नामदेव नालेगावकर, अजय अंधारे, सुनील दिघे, मंगेश भोसले, अकीब इनामदार तसेच होमगार्ड रोहित सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष लांडे व पदवीधर पोलीस अंमलदार राघव कोतकर करीत आहेत.


