शिर्डी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चैन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिर्डी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चैन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त


शिर्डी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! चैन स्नॅचिंग व दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; ३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त
शिर्डी । प्रतिनिधी । शिर्डी शहर व परिसरात चैन स्नॅचिंग, जबरी चोरी आणि मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत शिर्डी पोलिसांनी एकूण ५ गुन्हे उघडकीस आणत ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिर्डी पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाला मोठे यश मिळाले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार तसेच शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये चैन स्नॅचिंग, जबरी चोरी व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पथक तयार करण्यात आले होते.
संशयित आरोपींचा पाठलाग करून कारवाई
दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री गणपती उत्सवाच्या अनुषंगाने शिर्डी शहरात रूट मार्च सुरू असताना पोलीस अंमलदार पोलीस नाईक सतपाल शिंदे यांनी दोन इसम संशयित मोटारसायकलवरून फिरत असल्याची माहिती दिली. सदर माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांची नावे १) विनोद गंगाराम पवार, रा. राजीवनगर, नाशिक, मूळ रा. टाकळीगाव, ता. जि. नाशिक आणि २) प्रेम सुधाकर पवार, रा. टाकळीगाव, ता. जि. नाशिक अशी असल्याचे समोर आले.पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी शिर्डी शहर व परिसरात चैन स्नॅचिंग तसेच मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरून तपासणी करण्यात आली असता संबंधित गुन्हे उघडकीस आले.
पाच गुन्ह्यांची उकल
आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये खालील गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
१. शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक १९३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४).
२. शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४).
३. शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२).
४. शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ४१४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२).
५. शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक २८७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२).
सोन्याच्या लगडी व दोन मोटारसायकली जप्त
शिर्डी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून सोन्याच्या चार लगडी व दोन मोटारसायकली असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, १८ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड तसेच होंडा कंपनीची व हिरो कंपनीची मोटारसायकल यांचा समावेश आहे.
इतर पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचीही नोंद
प्रेस नोटनुसार, आरोपी विनोद गंगाराम पवार याच्याविरुद्ध नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपी प्रेम सुधाकर पवार याच्याविरुद्धही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकांक्षा जाधव करीत असून, आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुटे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक आकांक्षा जाधव, पोलीस हवालदार सचिन धनाड, पोलीस हवालदार रामेश्वर वेताळ, पोलीस अंमलदार सतपाल शिंदे, नितीन शेलार, सुनील दिघे, अजय अंधारे, नामदेव नालेगावकर, राजेंद्र बिरवडे, प्रमोद जाधव, केवळसिंग राजपूत, विजय धनधेरे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.शिर्डी पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत असून, चोरी व चैन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी केलेली ही कारवाई कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.


