ब्रेकिंग

राज्यात त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठी मदत करा – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

सरकार व प्रशासनाच्या विरोधात संगमनेर मध्ये हजारो नागरिकांचा महाअक्रोश मोर्चा

राज्यात त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठी मदत करा – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

सरकार व प्रशासनाच्या विरोधात संगमनेर मध्ये हजारो नागरिकांचा महाअक्रोश मोर्चा

संगमनेर । प्रतिनिधी । तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाया गेली, तालुक्यात विजेचा मोठा खेळखंडोबा झाला असून तालुक्याचे हक्काचे पाणी पळवले जात आहे. या विरोधात तालुक्यातील हजारो शेतकरी, नागरिक, युवक व महिला यांनी रस्त्यावर उतरून सरकार व प्रशासना विरोधात महाअक्रोश मोर्चा काढला असून सरकारने महाराष्ट्रात त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना मोठी मदत करावी अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे नेते मा महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. याचबरोबर सरकार जागे झाले नाही तर जागा सोडावी लागेल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

संगमनेर मध्ये शेतकरी व नागरिक यांच्या वतीने दुष्काळ जाहीर करावा, तातडीने मदत मिळावी तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे, पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा, आवर्तन काळात नदीकाठी हक्काची 11 तास वीज उपलब्ध असावी यासाठी शेतकऱ्यांचा भव्य आक्रोश मोर्चा संपन्न झाला. यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय झालेल्या या मोर्चामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात ,ॲड माधवराव कानवडे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच शेतकरी बैलगाडी ट्रॅक्टर जळालेली पिके घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. या प्रसंगी सरकारच्या व प्रशासनाच्या विरोधी घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी संगमनेर बसस्थानकासमोर शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात बोलताना काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून पिके जळाली आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र तरीही सरकार जागे व्हायला तयार नाही. सरकार जागे झाले नाही तर शेतकरी त्यांना जागा सोडायला लावेल.

खोट्या बातम्या द्यायच्या, आशेला लावायचे हे काम सरकार करत आहे. दुसऱ्या विषयाकडे जनतेचे लक्ष वळून दिशाभूल करायची. असा उद्योग सुरू असून खोट्या बातम्या नको तर प्रत्यक्ष मदत हवी आहे. सर्वत्र पिके वाया गेली आहे. पंचनामे कसले करता, राज्यात कुठे पाऊस नाही त्यामुळे सर्वांना मदत करा.यावर्षी 1972 पेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे पावसावर आधारित संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे. मात्र सरकार बातम्यांच्या बाहेर पडायला तयार नाही. बातम्या नको ठोस मदत करा.नवीन माणसांना पाण्याची लढाई माहित नाही. हक्काच्या 30% पाण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय पिचड साहेब आणि आम्ही लढलो आणि म्हणून पाणी मिळाले. त्यावेळी पूर्वीचे पाट रुंद केल्यामुळे पुन्हा पाणीपूर्वेकडे वाहून जात होते .पुन्हा न्यायालयीन लढाई करून आवर्तन काळामध्ये 11 तास हक्काची वीज मंजूर करून घेतली.

निळवंडे धरण व पाठासाठी रक्ताचे पाणी करून ते पूर्ण केले. प्रत्येकाचे पुनर्वसन केले. निधी आणला. तालुक्यातील साडे बासष्ट हजार एकर शेती या पाण्याखाली येणार आहे. हे या शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आहे. दोन्ही कालव्यांना काँक्रिटीकरण केल्याने पाणी पुढे जात आहे. हक्काचे पाणी उचलता येत नाही आणि उचलले तर तीन लाखापर्यंत ग्रामपंचायतना बिल आले आहे.विज जाते म्हणजे फक्त वीज जात नाही. तर पाणी पुढे जाते .पाणी पुढे गेले तर संपूर्ण जीवन आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल म्हणून वेळीच जागे व्हा. असे सांगताना सरकारने शेतकऱ्याच्या शेतावर काम करणाऱ्या शेतमजुराचा सुद्धा विचार केला पाहिजे .त्याची सुद्धा मजुरी दिली पाहिजे. याचबरोबर आता कोणतीही दिरंगाई न करता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठी मदत करा. तालुक्याला हक्काचे पाणी व वीज मिळाली पाहिजे अशी मागणी मागणी त्यांनी केली.तर मा आ डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, तालुक्यामध्ये विजेचा खेळ खंडोबा झाला आहे .तोंडाचा घास पळवला जात आहे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे बाजारपेठ ओस पडत चालली आहे .शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढले आहे. सत्ताधारी संगमनेर तालुक्याकडे दृष्ट बुद्धीने पाहत आहेत. जगात प्रकाश पाडला म्हणतात पण इथे अंधार पडला आहे त्याचे काय असा सवाल त्यांनी केंद्र व राज्य सरकारला केला.

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, मोठा संघर्ष करून संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी व वीज लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मिळवली आहे. निळवंडे धरण व दोन्ही कालवे त्यांनी पूर्ण केले डोळ्यात देखत पाणी वाहून चालले आहे. धरण थोरात साहेबांनी केले आणि तुम्ही खोटे श्रेय कशाला घेता. 85 पूर्वी तालुक्यामध्ये 3 सब स्टेशन होते आता 28 विजेचे सबस्टेशन कार्यरत आहे. विजेचे जाळे निर्माण केले आहे. तालुका विकसित आणि समृद्ध केला आहे. मात्र काही लोक फ्लेक्सच्या पुढे जायलाच तयार नाही. तर नवीन लोकप्रतिनिधीचे नाव न घेता भाऊ तुम्ही चांगला अभ्यास करा. तालुका उभा कोणी केला आहे. हे चांगले पहा. असा टोला त्यांनी लगावला.यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, कार्याध्यक्ष अमोल शेरकर, रामहरी कातोरे, किसनराव पानसरे, कोमल उगले, भाऊराव रहाणे, प्रियांका गडगे, संदीप थिटमे, कल्याणी राहणे यांनीही सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला केला. यावेळी शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळत होता.

निष्क्रिय माणसाबद्दल जास्त चर्चा करू नका

या मोर्चामध्ये संगमनेर चे नवीन लोकप्रतिनिधी यांच्यावर शेतकऱ्यांनी जोरदार टीका केल्या. यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की फ्लेक्सच्या पुढे त्यांचे राजकारण नाही. कधी एक वाक्य पाण्यावर हा गडी बोलत नाही .गावोगावी 2000 फ्लेक्स लावले आहेत. फ्लेक्सला पैसे आले कुठून माहित नाही. फ्लेक्स लावून पोट भरणार नाही. फ्लेक्स चे पैसे गरिबांसाठी खर्च करा. या फ्लेक्सबाज वृत्तीचा तालुका निषेध करत असून तालुक्यातील नागरिकांना काम पाहिजे. त्यामुळे अशा निष्क्रिय माणसाची जास्त चर्चा करू नये असा टोला मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता लगावला. यावेळी उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!