गौतम पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक दिन व अभियंता दिन साजरा
गौतम पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक दिन व अभियंता दिन साजरा


गौतम पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक दिन व अभियंता दिन साजरा
कोपरगांव । प्रतिनिधी । कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर येथे शिक्षक दिन व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, तांत्रिक, सामाजिक व सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांनी दिलेले ज्ञान, मार्गदर्शन व योगदानाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. वसीम शेख, संस्थेचे इन्स्पेक्टर नारायण बारे आणि कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन व पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, तांत्रिक, सामाजिक व सर्वांगीण विकासात शिक्षकांचे योगदान अतुलनीय असून त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त केली.तसेच संस्थेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास नाशिक येथील संदीप युनिव्हर्सिटीचे प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी विवेक विसपुते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना अभियंत्यांचे राष्ट्राच्या विकासातील योगदान, तांत्रिक ज्ञान, नवकल्पना आणि सर्जनशीलतेचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू होता. या निमित्ताने सर्व विभागांतील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धाचे आयोजित करण्यात आले असून या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक ज्ञान, सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण विचार प्रदर्शित केले.प्रमुख पाहुणे विवेक विसपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तांत्रिक ज्ञानासोबतच कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण विचार, समस्या सोडविण्याची क्षमता आणि उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी सातत्याने नव नवीन कौशल्ये आत्मसात करून यश मिळवावे असे आवाहन केले.यावेळी संस्थेचे निरीक्षक नारायण बारे, प्राचार्य वसीम शेख, कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे, सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, समन्वयक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


