उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या पाठोपाठ विद्यमान स्वीकृत नगरसेविका सोनल अजमेरे यांचेही पद धोक्यात

उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या पाठोपाठ विद्यमान स्वीकृत नगरसेविका सोनल अजमेरे यांचेही पद धोक्यात

कोपरगावच्या राजकारणात पुन्हा खळबळ
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव शहरामध्ये चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या जातीच्या बनवत असल्याचे सांगितले असता पुन्हा एकदा कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान स्वीकृत नगरसेविका सोनल अजमेरे यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीत खोटे प्रतिज्ञापत्राच्या मदतीने पद मिळवले असून त्यांचे पद रद्द व्हावे याबाबत कोपरगाव न्यायालयात खटला दाखल केला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते विजय नागरे यांच्या वतीने पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी दिली आहे.

त्यामुळे कोपरगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून कोल्हे गटाच्या अजून एका नगरसेवकाचेही पद धोक्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते विजय नागरे यांच्या वतीने अॅडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले कि, कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत स्वीकृत नगरसेवक हे पद २०१० च्या निकषानुसार पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा अहर्तामध्ये सेक्शन ४ मध्ये दिलेल्या नुसार पात्र असावा लागतो. यानुसार कोल्हे गटाच्या सोनल अजमेरे यांनी सेक्शन ४ प्रमाणे नामनिर्देशन अहर्ता छ प्रमाणे धारण करून त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. मात्र यामध्ये सोनल अजमेरे यांनी दाखवलेली संजीवनी सांस्कृतिक मंडळ, सहजानंदनगर, शिंगणापूर संस्था कोपरगाव नगरपरिषद कार्यक्षेत्रात येत नाही या संस्थेच्या घटनेनुसार कार्यकारी मंडळावर नियुक्तीसाठी संबंधित व्यक्ती किमान एक वर्ष संस्थेची सभासद असणे आणि संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा कायम सेवक असणे आवश्यक आहे. त्यामुळे या अटींमध्ये नगरसेविका सोनल अजमेरे बसत नसून त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली असल्याचे दिसून आले आहे. स्वीकृत नगरसेवक पद २०१० च्या निकषानुसार पात्र उमेदवारासाठी राखीव असताना सोनल अजमेरे यांनी चुकीची माहिती देवून फसवणूक केली असून त्यांची झालेली निवड हि पूर्णतः बेकायदेशीर आहे. त्याबाबत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून न्यायालयातही अपील दाखल करण्यात आले आहे. सत्ताधारी कोल्हे गटाच्या आणखी काही नगरसेवकांनी देखील अशाच प्रकारे खोटी माहिती देवून पद मिळविले आहे. त्यांचेबाबत कागद पत्र उपलब्ध झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे अॅडव्होकेट मुन्ना सय्यद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे कोपरगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सोनल अजमेरे यांच्या स्वीकृत नगरसेवक पदावर टांगती तलवार या प्रकरणामुळे निर्माण झाली आहे.



